“परवा जेवायला येशील संध्याकाळी? बरं. काय करून घालायचं तुला यावेळी?”
“आजी , कांद्याची आमटी कर. आमटी, भात, आणि तुझं कैरीचं लोणचं! फक्कड बेत जमेल.”

कुठल्याही आजीपासून लांब राहणाऱ्या नातवाला हे संवाद नवीन वाटणार नाहीत. पदार्थाचं नाव बदलेल फक्त; पण त्यातली गोडी, आपण खाताना समोर बसून आपल्याकडे पाहणारे मायेचे डोळे, आणि तुडुंब भरलेलं पोट; ते मात्र सगळ्यांना सारखंच.

आणि माझं भाग्य इतकं, की मला हा प्रश्न एकदाच नाही तर सहा वेळेला उत्तरावा लागतो. दोन नाही, बारा मायेचे डोळे. दोन आज्या, दोन काकवा, आत्या आणि मावशी! माझी आईसुद्धा तशी भाग्यवानच. तीन बहिणींमध्ये आणि तीन जावांमध्येही सगळ्यात धाकटी. त्यामुळे ‘घरंदाज’ पदार्थ, पीठं, मसाले, लोणची इत्यादी गोष्टी आमच्याकडे तय्यार पोहोचायच्या मी लहान असल्यापासून. आमची चंगळच! पण झालं असं, की अगदी आत्ता-आत्तापर्यंत ती कधी लोणची घालायला शिकलीच नाही. समाजव्यवस्थेच्या दृष्टीने ही यंत्रणा उत्तम आहे, कारण मग प्रत्येक सुनेबरोबर नवीन पदार्थ येतात आणि जावयांबरोबरही. पण जग बदललंय, अंतर वाढलंय, आणि त्याबरोबर पाककृती लांब चालल्या आहेत. संस्कार आणि संस्कृती आपल्यात भिनलेल्या असतात, आणि आपण जाऊ तिथे आपल्याबरोबर येतात. पण मी स्वयंपाकघरात फार लक्ष कधी दिलं नाही याचा परिणाम म्हणून गणपतीच्या पहिल्या दिवशी बनते तशी मटार-बटाट्याची उसळ माझ्या मुलांना कधीच खायला मिळणार नाही की काय?

मला आजही आठवतंय. एका उन्हाळ्याच्या सुट्टीत मी ठरवलं होतं की पुण्याच्या आजीकडून माझे आवडते चार पदार्थ शिकून घेईन. बारा-तेरा वर्षांची असेन मी तेव्हा. पण भावंडांबरोबर पत्ते आणि बॅडमिंटन खेळता-खेळता सुट्टी संपून गेली, आणि माझा निश्चय राहिलाच बाजुला, न वाळलेल्या पापडासारखा. माझ्या थोरल्या मावशीला येतात बरेचसे आजीसारखे पदार्थ बनवता. पण मी आहे सातासमुद्रापार, कशी शिकू मग? तीच कथा दुसऱ्या बाजुलाही. आठ महिन्यांपूर्वी आजी वारली. आधी धीट मनाने समजावलं स्वतःला. पण गेल्या तीन महिन्यात राहून राहून आठवण येते. नुसता टेबलावर फोटो ठेवून रडू आवरणार नाही. पण वाटतं कदाचित ती बनवायची  तो एखादा पदार्थ तयार करावा. ती बसली असेल तिथून खळखळून हसून म्हणेल, “सायली म्हणजे धेंडा आहे. हळू ढवळ ग बाई.” पण येतं कुठे तसं काही बनवायला? काकूला फोन करता येईल. पण माझ्या संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या वेळेला तिकडे वाजलेले असतात पहाटेचे साडेतीन. झालंच मग!

परवा दोन मैत्रिणींबरोबर पुस्तकांच्या दुकानात गेले होते. पाककृतींच्या पुस्तकांचा एक अख्खा विभाग पाहून एक म्हणाली, “कोण ही पुस्तकं अजूनही विकत घेत असेल? इंटरनेट वर कुठलीही रेसिपी बघता येते ना!” आणि मला एकदम रुचिरा आठवलं. आज माझ्याकडे रुचिरा असतं, तर काकूसारखा गोडभात बनवता आला असता का? आणि एखाद्या कोड्याची चावी सापडल्यासारखी वाटली. म्हणजे कोडं होतं हे माहितीच नव्हतं. पण उत्तर मिळाल्यावर अगदी हुश्श झाल्यासारखं वाटलं. जागतिकीकरण आणि परदेशात शिक्षण, यामुळे मी पास्ता बनवायला शिकले. पण शेवया करता येत नाहीत मला आजही.

दोन्ही आज्या म्हणायच्या, “शिकून, मोठे होऊन, आपल्या मायदेशी परत या; घरी या.” मायदेशी परतते की नाही, हे नाही मला माहीत अजून. परतले तरी मी बदललेले असेन, घर तेच राहणार नाही, कुटुंब कदाचित वेगळं असेल. पण या ओढीच्या निमित्ताने आजीच्या पुरचुंडीतले चार पदार्थ करायला शिकले, तर घरच माझ्या जवळ येईल का?

Leave a comment